“मुंबई मे चावल का रेट क्या है?” चाचांनी मला विचारलं आणि हवेत उंच तरंगणारं माझं मन एकदम जमिनीवर आदळलं.
यावर्षी नाताळच्या सुट्टीत आम्ही मध्यरदेशात फिरायला गेलो होतो. 31 डिसेंबरला पचमढीच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्या गावात मुक्काम होता. दुपारचं जेवण आणि झाडाखाली खाटेवर थोडा आराम झाला. आता संध्याकाळी गावाशेजारच्या जंगलात फेरफटका मरायचं ठरवलं. पण रस्ते माहीत नाही आणि काळोख व्हायच्या आत परत पाहिजे म्हणून होमस्टेचे मालक यादवजींना विचारलं. यादवजींनी लगेचच त्यांच्या चाचांना फोन लावला.
सत्तरीच्या जवळचे चाचा ठरवलेल्या वेळेच्या थोडे आधीच हजर झाले. वेष साधारण गुरख्यासारखा होता. हातात दणकट काठी, पांढरं धोतर, वर गडद निळ्या रंगाचा स्वेटर. स्वेटरखालून पांढरा झब्बा अगदी दोन बोट डोकावत होता. डोक्यावर भगवा गमछा बांधलेला आणि फक्त अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ते भुरभुरीत केस त्यामधून वाट काढत होते.

चाचांना बघताच या वयात आपल्यामुळे उगीचच यांना त्रास होणार या विचाराने मी ओशाळलो. पण आता बोलावून नको कसं म्हणायचं. गावातल्या छोट्या रस्त्यांवर मधूनच येण्याऱ्या चिखलामधल्या दगडांवरून लीलया तोल सांभाळून आम्ही पुढे चालू लागलो. डावीकडे शेतं आणि उजवीकडे कुडा-मातीची घरं होती. एखाद्या घरातून छान चहाचा सुगंध येत होता.
चाचांच्या वेगासोबत बरोबरी करताना आमची दमचाक सुरू झाली. पाच मिनिटांत कळलं की हे या मातीत मुरलेलं हाड आहे. हळू हळू गप्पा सुरू झाल्या. चाचा गावातल्या पर्यटकांना अगदी तीन चार तासांच्या ट्रेकला सुद्धा घेऊन जातात, त्यांचं चालणं बघून आता मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं नाही. पक्षांच्या शिळींचा मागोवा घेत चालताना गाव कधी मागे पडलं ते कळलंच नाही. बरंच अंतर कापल्यावर आम्ही थांबलो.
थोड्या उंच जागेवर मोकळ्या ठिकाणी जाऊन स्थिरावलो. सूर्य मात्र डोंगरापार आपल्या झोपडीकडे मंद पावलांनी चालला होता. इतका प्रवास करून झाल्यावर तो लालबुंद झाला होता. पण घरी परतण्याच्या आनंदात त्याने क्षितिजावर गुलाल उधळला होता. ताजेपणाच्या सुगंधाने भरलेल्या थंडगार वाऱ्याने आमचा थकवा दूर उडवून नेला. प्रत्येक पक्षी किलबिल करत घरट्याकडे जात होता. जंगलात फक्त आम्हीच गप्प होतो. मावळतीच्या सूर्याकडे एकटक पाहत मी ध्यान लावून बसलो होतो.
एवढ्यात न राहवून चाचांनी त्या शांतीचा भंग केला. “मुंबई मे चावल का रेट क्या है?”, चाचांनी मला विचारलं आणि हवेत उंच तरंगणारं माझं मन एकदम जमिनीवर जमीनीवर आदळलं. मी क्षणभर बाचकलो, खरतर थोडा रागच आला. पण या सोप्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी कुठलासा आकडा सांगितला. इतकं महाग उत्तर ऐकून त्यांचे डोळे चमकले. मग गहू, डाळी, साखर इत्यादी कठीण प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. दहा मिनिटात घरी सामान मागवणाऱ्या आमच्या जगात भाव विचारण्याला जागाच नव्हती. आई बाबांच्या लाडक्या काटकसर शब्दाशी आपण कशी प्रतारणा केली हे त्या क्षणी प्रकर्षाने जाणवलं.
मुंबईपेक्षा आपल्याकडे सगळं कसं स्वस्त आहे याचा सुप्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकू लागला. मुंबईतील उंच उंच इमारती आणि समुद्रकिनाऱ्याचं रंगीत वर्णन ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरुकुत्या जणू नाहीशा झाल्या. माझ्या शहरातल्या विश्वाची चाहूल घेत असताना त्यांनी स्वतःच जगही माझ्यासमोर मांडायला सुरुवात केली. छोट्याला पचमढीमधे नोकरी, थोडं शेत आणि गावात मागे राहिलेल्या मोठ्याला उरलेलं सगळं शेत अशी वाटणी केलेली. मुलीचं लग्न जवळच्या गावात सुखवस्तू कुटुंबात केलं. प्रत्येक वाक्यागणिक त्यांच्या पांढऱ्या दाढी मिशांमधल्या वाळलेल्या ओठांची कडा लांब होत होती.
त्यांचं जग फार मर्यादित होतं. आपल्या विश्वाबाहेरच जग जाणून घ्यायचं त्यांचं कुतूहल नवीन खेळणं मिळालेल्या लहान बाळासारखं गोंडस होतं. मुंबईत एक बेडरूम जास्त मिळवण्याची खटपट करणाऱ्या मला मात्र काहीतरी उमगलं होतं.
