“गवतफुला रे गवतफुला, रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला” - इंदिरा संतांनी काय सुरेख वर्णन केलंय त्या माळरानावरच्या इवल्याश्या फुलाच!!
तुम्ही कधी पाहिला आहे का या गवतफुलाला? नाही नुसतं त्याच्याकडे बघणं नाही किंवा फोन उचलून काढलेला फोटो नाही, त्याच्या बाजूला जरा थांबून त्याला न्याहाळत, मंद वाऱ्यामध्ये आपला थकवा उडवत त्याचा सौंदर्य अनुभवलं आहे का?
त्यादिवशी संध्याकाळी मुख्य रस्ता सोडून एका छोट्या गावातल्या शेतातून मी माझ्या होमस्टेकडे जायचं ठरवलं. हिमालयातल्या डोंगरांचे चढ हे आपल्या महाराष्ट्रातल्या डोंगरां पेक्षा खूप तीव्र असतात. थोडं वर चढून गेल्यानंतरही चांगलीच धाप लागते आणि इथलं ऊन सुद्धा खूप कडक असतं त्यामुळे सन स्क्रीन लावलं नसेल तर खूप त्रास होऊ शकतो. पण जेव्हा थोड्या सावलीत येतो तेव्हा अंगाला थंडगार वारा लागतो. कधी असेही होतं की समोरून ऊन येत असेल तेव्हा छातीला गरम वाटतं पण मागे पाठीला सावलीमुळे थंड वाटत.

तर अशा या हिमालयाच्या कुशीत बसलेल्या एका गावातील शेतामधून आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत मी हळूहळू पुढे सरकत होतो. साधारण अर्धा तास गेल्यावर फारच दमलो, श्वास फुलू लागला. समोर दिसलं एक मोठ्ठ झाड, ज्याची सावली जणू श्रमिकांना दिलासा देण्यासाठी पसरली होती. बाजूला कपड्यांमध्ये लपेटलेलं एक थंडगार पाण्याचा मडकही होतं. शेतात काम करणाऱ्या लोकांसाठी ते तिथे ठेवलेलं असतं. थोडी विश्रांती घेण्यासाठी ही जागा उत्तम होती.
हिरवगार रान, सळसळणाऱ्या पानांचे मृदुल संगीत आणि मधूनच येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकांवर हिंदोळे घेणारी ती ज्वारीची पाती. सगळं कसं स्वप्नवत होतं. फोटो काढण्यासाठी लगेच हात मोबाईल कडे नेला पण काय जाणवलं माहित नाही दुसऱ्याच क्षणी तो फोन मी परत ठेवला. त्या झाडाच्या सावलीत गवतावरच पसरलो. जरा बाजूला पाहिलं तर माझ्या सोबतीला होती तीच इंदिरा संतांच्या कवितेतली गवतफुल. मुक्त स्वर स्वच्छंद झुलणारी गवतफुल. त्या अनुभवाला शब्दात मांडण्याएवढी प्रतिभा माझ्यात नाही.

मी त्या फुलांना विचारलं इतके सुंदर रंग माळून कुठे निघालात? किती लाईक्स मिळाली इन्स्टावर? मी फोटो काढून अजून एक शेअर करू का? स्मित हास्य करून एका अज्ञानी पामराकडे ते पाहत राहिले!
शब्द नाही, उत्तर नाही, पण मला उत्तर मिळाले. कोणाशी स्पर्धा नाही, कोण काय म्हणेल किंवा अगदी दखलही घेईल की नाही याची चिंता नाही. कर्म करत राहणे, फक्त सुंदर बनणे आणि जीवनाचा आनंद घेत रहाणे. कोणीही लहान नाही मोठा नाही, कोणाची दाद मिळण्याची गरज नाही! त्या गवतफुलांचं जगणं खरं जगणं नाही का?
