“हरररर… हरररर… महा~~देव!”
अशी मोठी आरोळी ऐकू आली आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. मान वळवली तर बाजूला एक तेजस्वी साधू उभा ठाकला होता. वाराणसीत खरच असं घडतं?
झालं असं, होळीच्या आधीचा एक आठवडा वाराणसीत राहायचं आम्ही ठरवलं होतं. बरेच लोक इथे देवदर्शनासाठी येतात. आम्हाला मात्र काशी विश्वेश्वराच्या दर्शनाबरोबरच काशी अनुभवायची होती.
इथल्या गल्ल्यांमध्ये असे अनेक अचंबित करणारे अनुभव येतात. इथल्या हवेत एक वेगळीच धुंदी आहे, ती अनुभवायला इथेच यावं लागतं. वाराणसीचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर इथल्या प्रत्येक घाटावर फिरायचं, तिथल्या गल्ल्यांमध्ये फेरफटका मारायचा, वेगवेगळ्या मंदिरांत जाऊन काही वेळ बसायचं. प्रत्येक दिवशी एक वेगळा अनुभव, वेगळे विचार आणि निरनिराळे भाव मनाला आतून स्पर्श करून जातात.
आज दशाश्वमेध घाटावर होलिका दहन पाहून जेवणासाठी पुढे आलो. वातावरण होळीच्या जल्लोषाच्या कल्पनेनेच भारून गेलं होतं. दुकानांच्या गळ्यात एलईडी लाईटच्या माळा घातल्या होत्या. झाडांवरही नक्षत्र खाली उतरली आहेत असं भासवणाऱ्या टिमटिम लाईट्स पानांच्या मागून डोकावत होत्या. झालर-पताकांचे दागिने घालून दुकाने सज्ज झाली होती.
मी सुद्धा डोक्यावर गमछा, अंगात भगवा कुर्ता वगैरे घालून फिरत होतो. इथे आल्यावर आपण इथलेच होऊन जातो. चालता चालता कुणीतरी आपल्याकडे पाहून हसतो आणि नमस्ते म्हणण्याऐवजी दोन्ही हात वर करून, हाताचे पंजे उघडत, “हरररर… हरररर… महा~~देव!” असं एका विशिष्ट लयीत म्हणत पुढे निघून जातो.
पौराणिक कथांची आवड असल्यामुळे माझा मुलगाही या वातावरणात अधिकच उत्साहात होता. त्यानेही भरपूर ‘ॐ’ असलेला पांढरा सुती कुर्ता घातला होता. गळ्यात दोन रुद्राक्षांच्या माळाही आवडीने घातल्या होत्या.
उगाचच छोटी-मोठी खरेदी करत आम्ही एका पूजेच्या साहित्याच्या दुकानासमोर आलो. पूजेच्या साहित्याबरोबरच इथे विविध प्रकारच्या रुद्राक्षांच्या माळा, गमछे, छोटे-मोठे साधे कुर्ते, डमरू, शंकराच्या डोक्यावरचा नाग, चंद्र वगैरे बरंच काही होतं. बाहेर एका वितीपासून सहा फुटांपर्यंत उंच असे त्रिशूळ ठेवले होते.
आमच्या चिरंजीवांचं बालमन इथे गुंतलं यात काही नवल नाही. त्याला तर पूर्ण दुकानच विकत घ्यायचं होतं!
एक डमरू आणि एक छोटा त्रिशूळ आम्ही आधीच घेतला होता. पण साहेबांना त्यांच्या उंचीएवढा मोठा त्रिशूळ हवा होता. मी त्याला समजावण्याची पराकाष्ठा केली, पण त्याचा हट्ट काही केल्या जात नव्हता.

एवढ्यातच,
“हरररर… हरररर… महा~~देव!”
अशी मोठी आरोळी ऐकू आली आणि सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
मान वळवली तर बाजूला एक तेजस्वी साधू उभा ठाकला होता.
तसं वाराणसीमध्ये हजारो साधू भेटतात; पण हा थोडा वेगळा होता. अंगाने तरुण, साधारण साडेपाच फूट उंची, हातात काठी आणि कमंडलू, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, अगदी स्वच्छ आणि नेटके भगवे कपडे आणि याबरोबरच चेहऱ्यावर एक स्थितप्रज्ञ शांत स्मित होतं.
तो पुढे आला आणि मुलाकडे पाहत म्हणाला,
“क्या चाहिये बेटा?”
मुलाने आपली यादी ऐकवली.
तो हसतच म्हणाला,
“इतनीसी बात!”
मग दुकानदाराला न विचारता त्याला हवा तसा एक त्रिशूळ काढून त्याच्या हातात दिला. पुढे थेट दुकानदाराला डमरू, नाग, गमछा इत्यादी आज्ञांची सरबत्ती सुरू झाली.
त्या खंबीर आवाजाने अगदी भारावून गेल्यासारखा दुकानदारही सर्व गोष्टी पटापट आणून देत होता.
काही क्षणांतच त्या साधूने मुलाला चक्क शंकरासारखं नटवलं.

आम्हालाही फोटो काढायची आज्ञा झाली.
“अब फोटो हो गया. चलो, अब सब वापस करो.”
असं म्हणताच मुलानेही आनंदाने सर्व गोष्टी परत दिल्या. त्याच्या मनाचं समाधान आता झालं होतं.
त्या साधूचे आभार मानत मी तो कुठल्या आखाड्यात राहतो वगैरे चौकशी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर,
“हम तो बाबा की धरती पे रहते हैं. सभी बाबा के भक्त हैं. नाम में क्या रखा है?”
अशी उत्तरं देत हा झंझावात जसा आला होता तसाच पुढे निघून गेला.
पण दुसऱ्या दिवशी एक वेगळीच गंमत घडली. आज होळी होती. हुल्लडबाजीच्या धास्तीमुळे बायको आणि मुलाला हॉटेलमध्येच ठेवून मी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी खाली उतरलो.
सकाळचे सात वाजले असावेत. घाट पूर्णपणे शांत होता. मग कालच्याच त्या गल्लीत शिरलो. कालच्या झगमगाटाचा आज लवलेशही उरला नव्हता. कालच्या होलिका दहनाचे विस्तव तेवढे धगधगत होते. सर्व दुकाने बंद. घरे बंद.
थोडं लवकरच झालं होतं, तरी अशा शांततेची अपेक्षा नव्हती. इथल्या होळीबद्दल जे मी ऐकलं होतं, त्यावर आता थोडी शंका वाटू लागली.
एका गल्लीच्या भिंतीवरचं सुंदर चित्र पाहत होतो, तेवढ्यात माझ्या दिशेने नम्र प्रश्न आला,
“सर, आप यहाँ कहाँ?”
एका घराच्या उंबरठ्यावर एक गोरापान, जीन्स आणि टी-शर्ट घातलेला, तरुण मुलगा आश्चर्याने माझ्याकडे पाहत होता.
“कल दुकान पे आप ही थे ना?”
“मैडम किधर हैं?”
कालच्या त्या साधूचं हे असं बदललेलं रूप पाहून मी थक्क झालो.
पण कालची त्याची वेशभूषा आणि अभिनय मात्र कुठल्याही कलाकाराला लाजवेल असाच होता.
सांगितलं ना, इथल्या हवेतच काहीतरी आहे!
मग त्याने मला त्याची खरी ओळख सांगितली. मुख्य बाजारात त्यांची साड्यांची दोन दुकाने होती.
त्याने केलेला चहाचा आग्रह मी नाकारला नाही. बाजूच्या एका चहाच्या दुकानात बसून आम्ही गप्पा मारल्या.
“घाटावर सहज कुटुंबासकट फिरू शकता. तिकडे धमाल असते. पण या गल्ल्यांमध्ये चुकूनही येऊ नका,” असा सल्ला घेत मी त्याचा निरोप घेतला.
वाराणसीची होळी पुढे कशी झाली, यावर पुन्हा कधीतरी…
“हरररर… हरररर… महा~~देव!”
