हिमाचलच्या पाच आठवड्यांच्या सहली मधली आज पहिली सकाळ. जाग तशी लवकरच आली, उठून आवरा आवर केली आणि चार वाजताच गाडी सुरू केली. आदल्या दिवशी बडोद्याला आलो होतो आणि आज मुक्काम उदयपूरला होता.
राजस्थानच्या सीमेपर्यंत पोहोचेपर्यंत दिवसाने डोळे उघडले होते. बायको आणि मुलगा अजूनही पहाटेच्या स्वप्नात रमले होते पण साधारण तीन तास गाडी चालवल्यावर पाय मोकळे करायचे होते. बाहेर कोवळं ऊन बाजूच्या शेतांवर अलगद उतरू लागलं होतं. दुतर्फा झाडं, बाजूला शेतं आणि काळ्या विठ्ठलाच्या चेहऱ्यावर पांढरा टिळा लावल्यासारखा सुंदर डांबरी रस्ता! अशा प्रसन्न वातावरणात तर देव मागाल ते देतो. समोर एक छोटीशी चहाची टपरी दिसली आणि गाडी आपोआप तिच्याकडे वळली.
आजूबाजूच सौंदर्य न्याहाळत, हातानेच एका चहाचा इशारा देऊन मी एका खाटेवर बसलो. साठीच्या जवळ झुकलेला तो एक माणूस. अर्ध्या बाह्यांची स्वच्छ पांढरी बनियान, पांढरं धोतर आणि पायात मोजडी. भारदस्त अशा मिशा हाताच्या वरच्या बाजूने सावरत, झुकलेल्या मानेने मला होकार देत ती दणकट शरीरयष्टी चुलीकडे गेली. उजव्या खांद्याच्या मागून ऐकू आलेल्या कोंबड्याच्या आरवण्याचा मागोवा घेत माझी नजर मागच्या कौलारू घराच्या अंगणात शिरली. शेताच्या बाजूला म्हशीचा गोठा होता, चार-पाच मोठी मडकी आणि जळणाची लाकडं पडली होती. चहाचा ग्लास माझ्या हाती देऊन तो जवळच्या कठड्यावर बसला.
चहाचा पहिला घोट आपल्या तप्त अस्तित्वाची जाणीव करून देत घशातून खाली उतरला. पोटापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने खरंच अंगात नवसंजीवनी आणली. मी सहजच गावाच्या नावापासून सुरुवात केली. माणूस बोलका होता. समोरच्या टेकडीवरच्या जंगलातून येणाऱ्या नील गाईपासून कोरड्या शेतीपर्यंत विषय रमले. मोठ्या मुलाचं लग्न जमवून संसार थाटून दिला होता आणि मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती. नकळतच आपल्या संसाराचं पूर्ण चित्र त्याने माझ्यापुढे मांडलं. कदाचित मन मोकळं करायला त्याला अनोळखी कान हवे होते. त्या चित्रामध्ये एक अभिमानी समाधान होतं. त्या क्षणी मला त्याचा हेवा वाटून गेला.
गप्पांचा ओघ सुरू असतानाच त्याने रस्त्याकडे पाहत मान डोलवत एक सलाम केला. एक थोडा वयस्कर पण नेटके कपडे घातलेला माणूस आमच्याच दिशेने येत होता. पेहराव साधारण सारखाच होता पण डोक्यावर सफेद फेटा होता.चेहऱ्यावर वृद्धत्वाच्या सुरुकुत्या स्पष्ट जाणवत होत्या. गावातला कोणी प्रतिष्ठित माणूस असणार. माझ्या समोरच्या खाटेवर येऊन तो बसला. होय नाय करीत त्यानेही चहाचा ग्लास हाती घेतला. मी मुंबईहून हिमाचलला जातोय असं चहावाल्याने गुजरातीतच सांगितल्यावर त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत कुतूहलाने निरखलं. आमचा संवाद आता गुजराती आणि माझं हिंदी मिश्रित मोडक गुजराती असा चालू झाला.
थोडे जुजबी प्रश्न झाल्यावर त्याने मला विचारले “गोत्र कौनसा है”? डोक्याला थोडा भार देऊन नेहमीसारखा कश्यप असा उच्चार बाहेर आला. मग काय हळूहळू विषय धर्म, ग्रंथ, रामायण, महाभारत असा वहात गेला. अप्सरेच्या सौंदर्याने भाळलेल्या ऋषी भारद्वाजांनी मातीच्या द्रोणात एका तेजस्वी बालकाला जन्म कसा दिला आणि तेच बालक पुढे कौरव-पांडवांचे गुरू द्रोणाचार्य कसे झाले अशा कथा सांगताना त्यांच्या डोळ्यात भीष्मपितामहसारखा ज्ञानाचा भंडार असल्याचा गर्व होता.

माझे आत्तापर्यंत दोन चहा झाले होते. सूर्यानेही आपली उपस्थिती ठळकपणे नोंदवली होती. पुढे प्रवासही बराच होता. सहसा पाच-दहा मिनिटांची विश्रांती घेणाऱ्या मला पाऊण तास कसा गेला हे कळलाच नाही. गप्पांच्या मैफिलीला आता विश्राम मिळायला हवा होता. मग त्या अनामिक सवंगड्यांची आठवण मनात साठवून मी त्यांचा निरोप घेतला. गाडीत परत येईपर्यंत दोघेही जागे झाले होते. गाडी पुन्हा महामार्गावर धावू लागली. मागे ती टपरी, ते शेत आणि ते दोघेही नजरेआड झाले.
प्रवासात आपण नेहमी नवीन ठिकाणं शोधत असतो. पण कधी कधी एखादं ठिकाण नव्हे, तर एखादा माणूस सापडतो. नाव विचारायचं राहून जातं, फोटो काढायचा सुचत नाही, पुन्हा भेट होण्याची शक्यताही नसते. तरी अशा भेटी स्मरणात राहतात. राजस्थानच्या सीमेवर घेतलेल्या त्या दोन कप चहाची चव आज फारशी आठवत नाही. पण त्या अनामिक सवंगाड्यांनी नकळत उघडलेला त्यांच्या आयुष्याचा ठेवा हीच अशा प्रवासाची खरी कमाई.
